जिल्ह्यात ई-चलन प्रणाली लागू वाहतूक शिस्तीला प्राधान्य
सातारा – जिल्ह्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. सुरक्षित रस्ते वाहतूक होण्यासाठी वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे या पुढील काळात बंधनकारक होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यात ई-चलन प्रणालीचा प्रारंभ केला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकावर कडक कारवाई होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला आता नवी दिशा लाभणार आहे.
सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीकोनातून वाहतूक नियमांचे पालन करणे काळाची गरज बनली आहे. या दृष्टीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ई चलन प्रणाली त्यानी कार्यान्वित करून वाहतूक यंत्रणेला शिस्त लावण्याचा निर्धार केला आहे.
रस्त्यावर वाहन चालविताना वाहनचालकांनी वाहनाचा वेगमर्यादेबरोबरच वाहनांची संबंधित कागदपत्रे स्वत: जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघाताच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. घडणारे अपघात वाहतुकीचे नियम न पाळण्याने अधिक होत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात ई-चलन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनचालकाना मात्र चाप बसणार आहे. वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता अनेकांकडे कागदपत्रेही नसताना वाहने रस्त्यावरती भरधावपणे धावत असतात. विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणाई यावर आघाडीवर असल्याचे दिसून येते. अशा अतिउत्साही वाहनधारकाना ई-चलन प्रणालीमुळे चाप बसणार आहे. बऱ्याचदा तरुणाई सुसाटपणे वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिफल सिट वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे अशा वाहनधारकांना या पुढील काळात स्वत:ला मुरड घालावी लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात ई-चलन प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. या पुढील काळात पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहून सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. यामुळे वाहतूक यंत्रणेला शिस्त लागेल, अशी अपेक्षा आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना वाहनचालकावर होणारी दंडात्मक कारवाईमध्ये ही प्रशासनाकडून पारदर्शकता आणली जाणार आहे.
श्रीरंग काटेकर, सातारा.