विनाकारण घराबाहेर पडल्यास वाहन जप्त

थेऊर  -करोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा नागरिकांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई तसेच,

नागरिकाने वापरलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याचे अधिकार पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

राज्य शासनाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागु करुन त्याची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे.

याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपुर्ण राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बंदोबस्त व नाकाबंदी लावण्यात आली आहे.

याचबरोबर होमकॉरंटाइन रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी, कोविड टेस्टींग रुग्णालय व लॅब, हॉटस्पॉट गावे, हाय अलर्ट व अलर्ट गावे इत्यादी ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. पुणे जिल्हयातील नागरिकांना अत्यावश्‍यक काम व कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

यामुळे नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवासाकरीता ई-पास काढणे अत्यावश्‍यक आहे. असे असतानाही नाकाबंदीच्यावेळी तसेच आंतर जिल्हा चेकपोस्ट येथे नागरिक अनावश्‍यक घराबाहेर फिरत असल्याचे आढळून येत आहे.

त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्यावतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसे अधिकार पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.