कारवाई होत नसल्याने वाढली संख्या : शहरात ठिकठिकाणी धूळ खात पडलीत वाहने
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बेवारस वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. त्यासाठी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले आहे मात्र स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी शहरातील बेवारस वाहने अडथळा ठरत आहे.
शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणसाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी स्वच्छतेसह नागरिकांमध्ये याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत.
स्वच्छ शहरमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र यामध्ये बेवारस वाहने अडथळा ठरत आहेत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने आहेत. रस्त्याच्या कडेला, उद्यानांच्या बाजूला, मैदानामध्ये ही वाहने अस्ताव्यस्त उभी आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ पसरलेली आहे. बेवारस वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये रिक्षा, कार, हलकी तसेच जड वाहनांचा समावेश आहे. तसेच अनेक वाहनांचे सुट्टे भाग चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे ही वाहने विचित्र अवस्थेत रस्त्याच्या बाजूला उभी आहेत. त्याचा स्वच्छ सर्वेक्षणवर परिणाम होत आहे.
बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ठिकठिकाणी या वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. ही वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर लपवण्याच्या उद्देशांनेही उभी केलेली असण्याची शक्यता आहे. ही वाहने ताब्यात घेऊन त्यांचा तपास करणे आवश्यक आहे. अनेकदा वाहन हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून नफ्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठीही ही वाहने बेवारस सोडली जातात.
कारवाई होत नसल्याने प्रमाण वाढले
शहरात अशा प्रकारे बेवारस वाहने सोडून देणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बेवारस वाहनांच्या मालकांना शोधण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयही काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढले आहे. मात्र यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच शहराच्या स्वच्छतेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाहतुकीचा प्रश्न ऐरणीावर
शहरातील पिंपळे सौदागर, निगडी, भोसरी, स्पाईन रस्ता या ठिकाणी रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने आहेत. त्यामुळे वाहतुकीकोंडी होते. ही वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूना उभी आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. अनेकदा वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी होते.