रांची – भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता त्यांच्या रांचीजवळील शेतात लक्ष घातले असून त्याने पिकवलेला सेंद्रीय शेतीमाल संयुक्त अरब अमिरातीत पाठवण्यात येणार आहे. हा शेतमाल आखाती देशांमध्ये पाठवण्याची जबाबदारी झारखंड कृषी खात्याने घेतली आहे.
महेंद्रसिंग धोनी नेहमीच वेगवेगळे ट्रेंड सेट करत असतो. त्याची हेअरस्टाईल, मोटारबाईक जमवण्याचा त्याचा छंद याची अनेकदा चर्चा झाली आहे. आता देशातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरले असे ट्रेंड तो सेट करत आहे. तब्बल 16 वर्षेदेशासाठी क्रिकेट खेळल्यानंतर त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याने वेगळ्याच क्षेत्रात मांडलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे.
रांचीजवळील त्याच्या 43 एकर क्षेत्रापैकी 10 एकर क्षेत्रात त्याने सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवला आहे. त्यामध्ये कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मटार यांचा समावेश आहे. धोनीच्या शेतातील कोबी आणि टोमॅटोला रांचीतील स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
रांचीतील शेती व्यवसाय 39 वर्षीय धोनीने जागतिक बाजारपेठेत नेला आहे. आता त्याच्या शेतातील भाजीपाला लवकरच दुबईच्या बाजारपेठेत विकला जाणार आहे.या सेंद्रीय शेतीमालाची पहिली कन्साईनमेंट रवाना होण्याच्या स्थितीत आहे. अमिरातीत हा भाजीपाला विकणारी एजन्सीदेखील निश्चित झालेली आहे. रांचीहून ताजा भाजीपाला अमिरातीत पाठवण्यासाठी झारखंडच्या कृषी खात्याने पुढाकार घेतलेला आहे.