भाजीपाला महागल्याने कडधान्यांवर गुजराण

उरुळी कांचन – हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात रविवार (दि.14) भाजीपाल्याचे दर 100 रुपये किलो झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली. ग्राहकांनी भाजीपाला खरेदीला फाटा देत कडधान्ये खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवली.

उरुळी कांचन येथे दर रविवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात लाखांच्या घरात आर्थिक उलाढाल होते. हा बाजार तिन्ही तालुक्‍यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांची गर्दी होते. दौंड तालुक्‍यातील सहजपुर भांडगाव, यवत भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. तेथील कामगार उरुळी कांचन येथील बाजारात खरेदीसाठी येतात. येथील आठवडे बाजारात भेंडी, गवार, ढोबळीसह भाजीपाला किलो 100 ते 80 रुपये होता. तर पालक, मेंथीसह भाजीपाला दोन जुड्या 50 ते 60 रुपयांना होत्या.

अनेक भाजीपाल्याच्या गड्डी अतिशय लहान असल्याने ग्राहकांनी कडधान्ये खरेदी केले. कडधान्ये ही जास्त कालावधीत टिकतात. तसेच खर्चात बचत होते. त्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवून कडधान्यांची खरेदी केली. ग्राहक भाजीपाल्याकडे फिरकले नाहीत. बाजारात भाजीपाल्याची भावाची चौकशी करून पुढे जात होते. कडधान्याचे व्यापारी लक्ष्मण अंघारे म्हणाले की, भाजीपालाचे दर कडाडले असून ग्राहकांना चांगलीच झळ सोसावी लागत आहे. महागाईचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. ग्राहक तूरडाळ, मुगडाळसह बेसन खरेदी करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.