आवक आणि मागणीतही वाढ
पिंपरी – पितृपंधरवड्यामुळे मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक झाली. फळभाज्यांची आवक 276 क्विंटल, तर पालेभाज्यांची आवक 12 हजार 850 जुड्ड्यांनी वधारली. कांदा, बटाट्याची आवक व भाव वधारले. लसणाची 14 क्विंटल आवक होऊन भाव 500 रुपयांनी घसरले. भेंडी आणि वांग्याची आवक 21 क्विंटलने वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. पावटा, काकडीची आवक घटूनही भाव स्थिर राहिले.
आल्याची आवक 72 क्विंटलने वाढली, तर भावात 750 रुपयांची घट झाली. गवारीची तीन क्विंटल आवक घटूनही भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. टोमॅटोची 14 क्विंटलची भर पडली असून, भावात 150 रुपयांची वाढ झाली. मटारची 38 क्विंटलने आवक घटूनही भावात दोन हजारांची वाढ झाली. घेवड्याची पाच क्विंटल आवक घटूनही भाव 750 रुपयांनी वधारले. दोडक्याची पाच क्विंटल आवक घटून भाव 500 रुपयांनी वधारले. मका कणीसची 23 क्विंटल आवक घटून भावात 100 रुपयांची घट झाली. लिंबांची पाच क्विंटल आवक वाढून भाव 200 रुपयांनी वधारले.
मिरचीची 14 क्विंटल आवक झाली. भावात 250 रुपयांची वाढ झाली. दुधी भोपळ्याची 16 क्विंटल आवक वाढून भावात 250 रुपयांची वाढ झाली. भुईमूग शेंगांची आवक चार क्विंटलने घटूनही 250 रुपयांचा भाव मिळाला. काकडीची 10 क्विंटलने आवक वाढून भाव मात्र स्थिर राहिले. कारल्याची सात क्विंटल आवक घटून भावात 750 रुपयांची वाढ झाली. डांगरची एक क्विंटलने आवक वाढून भावात किरकोळ वाढ झाली. 250 रुपयांचा भाव घेणाऱ्या चवळीची एक क्विंटल आवक झाली. घोसावळ्यांची दोन क्विंटल आवक होऊन भाव 2500 रुपयांवर स्थिरावला.
फ्लॉवरची 61 क्विंटल आवक झाली. कोबीची 50 क्विंटल आवक घटूनही भावात किरकोळ 100 रुपयांची वाढ झाली. पालेभाज्यांमध्ये मेथीची 8750 जुड्ड्या, कोथिंबीरीच्या 14,150 जुड्ड्या, शेपूच्या 5460 जुडी, कांदापातीच्या 1770 जुड्या, पालकच्या 2880 जुड्या, चवळीच्या 250 जुड्या, तर मुळ्याच्या 100 जुड्ड्यांची आवक झाली.