कोरेगाव भीमा -येथे एका 25 वर्षीय भाजी विक्रेत्यांचा अहवाल (दि.5) करोना बाधित आला आहे. या तरुणाला स्थानिक डॉक्टरांकडून पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने गावात खळबळ
उडाली आहे.
बाधिताच्या घराशेजारील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. ग्रामपंचयातीतर्फे परिसरात सोडियम हायपोक्लोराफाइडने फवारणी करण्यात आली आहे. तसेच रस्ते बंद करण्यात आले आहेत. हा युवक भाजीपाला व्यवसाय करीत आहे. त्याचे कुटुंबही याच व्यवसाय करीत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवार (दि.5) 14 दिवस संपूर्ण कोरेगाव भीमा गाव बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.
यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. लोकांनी गरज नसताना बाहेर फिरू नये, असे आवाहन सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच योगेश गव्हाणे यांनी केले आहे. व्यावसायिक व लोक दुकाने सुरू ठेवतील अथवा मास्क वापरणार नाही, अशांवर ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सांगितले.