दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे भाव कडाडले; गृहिणींचे बजेट कोलमडले

चिंबळी -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक घटल्याने दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाव वाढल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन ढासळले आहे.

चाकण बाजारात कांद्याचे भाव 20 रुपयांवरून 50 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. टोमॅटो 10 रुपये किलो दराने मिळत होते. आता ते 60 ते 80 रुपये भावाने मिळत आहे. तसेच हिरवी मिरची 10 रुपये किलोने विकली जात होती.

ती आता 60 ते 80 रुपये किलोने मिळत आहे. वांगी, गवार, भेंडी, दोडका या फळभाज्या 80 रुपये किलो, कोथिंबीरीची एक जुडी 50 ते 100 रुपये, तर हिरव्या वाटाण्याचे भाव प्रतिकिलो 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

प्रत्येक भाज्यांमागे प्रतीकिलो 30 ते 40 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. चाकण मार्केटमध्ये भाज्यांच्या भावात मोठी वाढ झाल्याने किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने भाज्यांची विक्री होत आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने तसेच आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांच्या भावात वाढ झाल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व व्यापारी रविंद्र बोराटे, तरकारी आडतदार चांगदेव बोराटे व धनंजय बोराटे आदींनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक घटल्याने भावात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाज्यांना पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. आवक वाढून ऐन दिवाळीत भावामध्ये घसरण होण्याची दाट शक्‍यता आहे. मालाला योग्य व पुरेसा भाव मिळणे अपेक्षित वाटते.
– रविंद्र बोराटे, व्यापारी चाकण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.