उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतरही भाजीपाल्याचे दर स्थिर

लसूण, बटाट्याचे दर घसरले; ढोबळी मिरची महागली

पिंपरी -मागील आठवड्यापासून तापमानात वाढ होत असल्यामुळे यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचा भास होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारतील अशी शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र, भाजीमंडईत फळभाज्यांची होणारी आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर स्थिर राहिले असून, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत भाजीपाला उपलब्ध आहे. या आठवड्यात लसूण आणि बटाट्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असून, आवक घटल्याने ढोबळी मिरची मात्र महागली आहे.

मोशी येथील उपबाजार समिती आणि पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजीमंडईमध्ये या आठवड्यातही फळभाजी आणि पालेभाज्यांची आवक सरासरीपेक्षाही जास्त झाली आहे. पुणे येथील बाजार समितीमध्ये सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील फळभाज्यांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला बटाट्याच्या दरामध्ये वाढ होत असते.

मात्र, यावर्षी बटाट्याची आवक मोठी झाल्यामुळे दरामध्ये वाढ होण्याऐवजी घसरण झालेली आहे. घाऊक बाजारात बटाटा एक हजार 100 रुपये क्विंटलने विक्री होत आहे तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय लसणाचे दरही कमी होऊन थेट 100 रुपये किलोवर आले आहेत. ढोबळी मिरची आवक मात्र कमी झाल्याने दरामध्ये वाढ झाली असून, ढोबळी मिरची 60 रुपये किलोने विक्री होत आहे. तर शेवग्याची आवक या आठवड्यातही कमीच झाल्याने शेवगा प्रतिकोली 60 ते 70 रुपये दराने विक्री होत होता. या आठवड्यात फळभाजीप्रमाणेच पालेभाज्यांच्या किमतीही स्थिर राहिल्या आहेत.

भाजीपाला विक्रीचे दर (भाव प्रतिकिलो)
बटाटे : 22 ते 25, कांदे : 25 ते 30, टोमॅटो : 8 ते 10, गवार : 30 ते 40, दोडका : 30 ते 40, घोसाळी : 50, लसूण : 100 ते 80, आले : 70 ते 80, भेंडी : 35 ते 40, वांगी : 35 ते 40, कोबी : 25 ते 30, फ्लॉवर : 20 ते 25, शेवगा : 60 ते 70, हिरवी मिरची : 35 ते 40, शिमला मिरची : 60, पडवळ : 40, दुधी भोपळा : 20 ते 25, लाल भोपळा : 30 ते 50, काकडी : 20 ते 25, चवळी : 50, काळा घेवडा : 50, तोंडली : 50, गाजर : 30 ते 35, वाल : 60, राजमा : 50, मटार : 30 ते 40, कारली : 30 ते 40, पावटा : 40 ते 50, लिंबू : 200 (शेकडा). तर, कोथिंबीर : 10 ते 15, मेंथी : 15, शेपू : 10, पालक : 8 ते 10, मुळा : 10, तांदुळजा : 10, पुदिना : 5, कांदापात : 10, चाकवत 15.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.