माण (सातारा )- देशसेवा बजावत असताना माण तालुक्यातील संभूखेड गावच्या 24 वर्षीय जवानाला वीरमरण आले आहे. सचिन विश्वनाथ काटे असे या जवानाचे नाव असून त्यांना राजस्थान येथे वीरमरण आले आहे.
जवान सचिन यांना देशसेवा बजावत असताना राजस्थानमध्ये बुधवारी (दि.२० ऑक्टोबर) रोजी रात्री वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली आहे. जवान सचिन यांच्या जाण्याने राज्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे.
सचिन काटे हे पाच वर्षापुर्वी भारतीय सेनेत भर्ती झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे. आई-वडिल हे गावी शेती करतात. त्यांच्या मागे आई वडील आणि लष्कर सेवेत असलेले भाऊ असा परिवार आहे.
सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथे लष्कराचे जवान घेऊन येत असून उद्या शनिवारी (दि.२२ऑक्टोबर) रोजी संभूखेड या जन्म गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.