भारतरत्न द्या म्हणून वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत

भाजपच्या जाहीरनाम्यावरून शिवसेनेची सरकारवर टीका

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्‍त काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता शिवसेना आणि भाजप यांच्यातच त्यांच्या जाहीरनाम्यावरून जुंपल्याचे दिसत आहे. कारणवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरजच काय असा प्रश्न शिवसेनेने आता विचारला आहे. मला भारतरत्न द्या असे म्हणत वीर सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर उभे नाहीत. त्यामुळे भाजपाच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करु हे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे क्‍लेशदायक आहे असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार आहे. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करु त्यासाठी भाजपाला मतदान करा असे भाजपाने जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात हा संदर्भ येणं क्‍लेशदायक आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने ही टीका केली आहे. यामध्ये विशेष बाब ही शुक्रवारीच महायुतीची सभा पार पडली, या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस केल्याचे कौतुक केले होते.

सामनाच्या अग्रलेखात मात्र भाजपाची ही भूमिका क्‍लेशदायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यायलाच हवे होते असेही अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. वीर सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारांचे महानायक होते. मात्र आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधी यांना खलनायक ठरवतो आहे तर दुसरा वर्ग सावरकर यांना खलनायक ठरवतो आहे. हे सगळे कधीतरी थांबायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.