नवी दिल्ली – केंद्र सरकार भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे भागभांडवल विकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी वेदांत उद्योग समूह 12 अब्ज डॉलर मोजण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
जर बीपीसीएल 12 अब्ज डॉलरला विकली गेली तर या कंपनीच्या शेअरचा भाव साधारणपणे 415 रुपये इतका होतो. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 395 रुपये प्रती शेअर इतका आहे. गेल्या काही दिवसापासून बीपीसीएल कंपनीच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.
पावर माय वेल्थ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वागळे यांनी सांगितले की बीपीसीएलच्या निर्गुंतवणूकीकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. या संदर्भात काही सकारात्मक घडामोडी घडल्या तर या शेअरच्या किमती नजीकच्या भविष्यात 430 रुपयापर्यंत वाढू शकतात.
बीपीसीएल कंपनीची निर्गुंतवणूक एप्रीलअगोदर करण्याचे संकेत अर्थ मंत्रालयाने दिलेले आहेत. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले होते, एलआयसी आणि बीपीसीएलमधील निर्गुंतवणूक प्रक्रिया एप्रिल आगोदर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणूकीच्या माध्यामातून जेवढी रक्कम उभी करायचे ठरविले होते. त्यापेक्षा कमी रक्कम आतापर्यंत उभी राहीली आहे. त्यामुळे या दोन महिन्यात सरकार जास्तीत जास्त रक्कम उभी करण्याच्या प्रयत्नात आहे.