-->

भारतीय वंशाचे लेखक वेद मेहता यांचे निधन

न्यूयॉर्क – भारतीय वंशाचे अमेरिकन कादंबरीकार वेद मेहता यांचे राहत्या घरी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. प्रज्ञाचक्षु असलेल्या वेद मेहता यांनी आपल्या दिव्यांगावर मात करून 20 व्या शतकातील लेखक म्हणून ख्याती मिळवली.

अमेरिकेतील वाचकांना त्यांनी आपल्या लेखनातून भारताची ओळख करून दिली. तब्बल 33 वर्षे “द न्यूयॉर्कर’ या नियतकालिकातून त्यांनी विपुल लेखन केले होते. या नियतकालिकाने मेहता यांच्या निधनाच्या वृत्तला दुजोरा दिला आहे.

मेहता यांचा जन्म फाळणीपूर्वी तत्कालिन पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये 1934 साली झाला होता. अवघे 3 वर्षाचे असताना मेंदूज्वर झाल्याने मेहता यांची दृष्टी गेली. मात्र आपली साहित्यिक प्रतिभा जगासमोर आणण्यामध्ये या अपंगत्वाला त्यांनी अडथळा बनू दिले नाही. आपल्या आजूबाजूच्या जगाचे अचूक आकलन करून त्याचे सर्वोत्तम वर्णन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

वयाच्या 15 व्या वर्षी ते अमेरिकेत गेले आणि ऑक्‍सफर्ड विद्यापिठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि नंतर लेखन कारकिर्दीला प्रारंभ केला. आपल्या थोरल्या बहिणी आणि मोठ्या भावाच्या मदतीने त्यांनी या अंधत्वावर मात केली त्यांच्यासारखेच बनू शकल्याचे मेहता एकदा म्हणाले होते.
मेहता यांनी लिहीलेले 12 खंडांचा स्मृतीग्रंथ विशेष प्रसिद्ध झाले आहे.

यामध्ये त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासातील समस्या आणि अंधत्वाच्या प्रारंभीच्या काळातील अडचणींच्या आठवणींबद्दल विवेचन केले आहे. मेहता यांनी लिहीलेल्या 24 पुस्तकांमध्ये भारताबाबतचा वृत्तांत, वॉकिंग द इंडियन स्ट्रीट, पोर्ट्रेट ऑफ इंडिय आणि महात्म गांधी ऍन्ड हिज ऍपोसिटस आदी गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.

याशिवाय तत्वज्ञान, धर्मशास्त्र अणि भाषाशास्त्राबाबतचे विवेचनही त्यांनी मांडले आहे. हे सर्व साहित्य मेहता यांनी आपल्या सहकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. स्वतः दिव्यांग असताना ते रस्त्याने चालताना कधीही काठी अथवा सहायकाची मदत घेत नसत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.