जयपुर – आमदारांच्या घोडेबाजारात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचाही हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या एजंटाने आठ महिन्यांपुर्वी माझ्याशी संपर्क साधून मलाही फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी संजय जैन नावाच्या या माणसाचा संबंधात उल्लेख केला. ते म्हणाले की तेच मला भेटण्यासाठी आले होते व त्यांनी मला वसुंधरा राजे यांना भेटण्याची सुचना केली होती.
सरकारा पाडण्याच्या कटाबद्दल संजय जैन यांना आता अटक करण्यात आली आहे. राजस्थानातील गेहलोत यांचे सरकार वाचवण्यासाठी वसुंधराराजे याच प्रयत्नशील असल्याची वदंता होती. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आमदाराकडूनच हा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान कालच वसुंधराराजे यांनी मौन सोडत कॉंग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्यांवर टीका केली होती. कॉंग्रेस मधील सत्तासंघर्षात राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.