वासुदेवाचं पोर डॉक्‍टर होतंय !

आधुनिक व पंचतारांकित सुखसुविधा, हजारो रुपयाचा हातात मोबाईल, अंगात फॅशनेबल कपडे, लाखो रुपये खर्च करून खाजगी क्‍लासेस लावून पैशाची उधळपट्टी करूनही यशस्वी न होणाऱ्या विद्यार्थी व पालक यांनी ‘अभिनंदन काळुंके यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मनामध्ये प्रबळ इच्छा असेल तर अशक्‍य वाटणारी गोष्ट सुद्धा होऊ शकते. परिस्थितीने गरीब असलो म्हणून काय झालं, बुद्धिमत्ता हीच श्रीमंती आहे याची पुन्हा एकदा प्रचिती अभिनंदन काळुंके याच्या रूपाने आली आहे. एका वासुदेवाचा मुलगा डॉक्‍टर होतोय हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विचार बदलला तर परिस्थिती बदलू शकते.

“लाख लाख डोळ्यांवरती नकलाकारांच राज्य असतं,स्वत:च्या जखमा पुसुन इतरांना हसवण्याचं भाग्य असतं”. दयानंद काळूंके यांची परिस्थिती बेताची. घरचे अठरा विश्व दारिद्रय, पदव्यूत्तर शिक्षण घेऊन तीन किलो प्रमाणपत्र व पोतं भरुन पदकं उशाला घेऊन नोकरीविना गुदमरलेल्या अवस्थेत जीवन जगत होते,ब्रॉंकायटीस नावाचा आजार सोबत घेऊन वासुदेवाची भुमिका करून पैसे जमा करीत होते, भुमिका केल्यानंतर श्वसनाचा खुप त्रास व्हायचा, स्टेजच्या पाठीमागे अडवा होवून, परत पोतराज, भविष्यवाला, आराधी, गोंधळी, मद्रासी रामण्णा, झेल्या, भटजी, महिलांची भुमिका, नकला सादर केल्यानंतर, अक्षरश: प्रत्येक वेळी दयानंद काळुंके यांना श्रोते डोक्‍यावर घेत होते.

आणि यातुन जमलेले पैसे संसारासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जायचे. नाचुन नाचुन अंग खिळखिळं झालेलं असायचं, पायावर घुंगरू आदळुन आदळुन पायसुध्दा अधु झाला,पण मुलांना शिकवणे हेच ध्येय काळूंके यांचे होते, मुलगा अभिनंदन व मुलगी अभिलाषा हेच त्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत,ते खुप शिकावेत, त्यांच्या हातुन गोर गरीब जनतेची सेवा घडावी ही स्वप्ने उराशी बाळगून दयानंद काळुंके, पत्नी अनिता काळुंके मार्गक्रमण करीत आहेत.

त्यांची दोन मुलं चुणचुणीत निघाली. जिद्द, चिकाटी, परिस्थितीची जाण व भविष्यात काय करायचे या गोष्टीचे भान त्यांच्याकडे आर्थिक परिस्थितीमुळे आलं.काळूंके यांना भरपूर शिकुनही डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील होता आलं नाही हे शल्य मनात जरी असलं तरी त्यांनी दोन डॉक्‍टरांचा बाप बनायचे हे लक्ष्य ठेवले होते. त्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे, आणि मुलगा अभिनंदन दयानंद काळुंके याने यशस्वी भरारी मारली, वैद्यकीय पूर्वपरीक्षेमध्ये यशस्वी गुण मिळवून मुंबई येथील शासकीय नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस ला नंबर लागला.

वासुदेवाच्या मुलाचा डॉक्‍टर होण्यासाठी लागलेला नंबर म्हणजे हा सर्वोत्तम मानाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद काळुंके कुटुंबियांना होत आहे. अभिनंदन काळुंके यांनी आपल्या परिस्थितीवर मात करीत वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाच्या माध्यमातून यशाचं एक शिखर जवळ करण्याचे काम केलं. अभ्यासामध्ये केलेल्या मेहनतीमुळे त्याला वैद्यकीय पूर्व परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळाले अभिनंदन काळुंके याला गतवर्षी दंतवैद्यकीय शिक्षणासाठी (BDS) साठी मुंबई येथील नायर वैद्यकीय महाविद्यालय येथे नंबर लागला होता तिथे प्रवेशही घेतला होता. पण अभिनंदन ला MBBS करायचे होते, म्हणुन मिळालेला प्रवेश रद्द करून पुन्हा NEET, CET या परीक्षांची तयारी केली. जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण होऊन त्याने MBBS ला प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पुर्ण केले.

शब्दांकन- शंकर दुपारगुडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)