आळेफाटा – दीपावलीचा पहिला दिवस म्हणजेच वसूबारस – आपल्या गोठ्यात असलेल्या गोधनाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्त शेतकऱ्यांनी आज (दि. 25) गोधनाची पूजा करून वसुबारस उत्साहात साजरे केले.
भारतीय संस्कृतीत गोमातेला फार महत्त्व आहे. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजेच वसूबारस यालाच संस्कृतमध्ये “गोवत्स द्वादशी’ असे म्हटले जाते. आश्विन वद्य द्वादशीला हा सण साजरा केला जातो. वस्तुत: हा सण वेगळा आहे. समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, अशी कथा आहे. त्यातील नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करतात.
गायीचे तूप, दूध, ताक, दही असे पदार्थ खात नाहीत. या दिवशी गायीला आणि तिच्या वासराला तळलेले पदार्थ दिले जात नाहीत, तर पुरणपोळीचा घास दिले जातो. हा शेतकऱ्यांनी मोठ्या उत्सहात साजरा केला. त्यानंतर घरावर आकाश कंदिल लावण्यात आल, तर महिलांनी तुळशीवृंदावनासमोर रांगोळी काढली होती, तर घरासमोर तोरणे व पणत्या लावून रोषणाई केली होती.