पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने तब्बल 18 दवाखाने बंद : चांगल्या उपक्रमाला गालबोट
पुणे – शहरात सुरू केलेली वस्ती क्लिनिक बंद पडली आहेत. मनुष्यबळ नसल्याने ती बंद पडल्याचे खरे कारण असताना महापालिका प्रशासनाने मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण दिले आहे. दिल्लीच्या धर्तीवर ही वस्ती रुग्णालये सुरू करण्यात आली होती.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने वस्ती पातळीवर अशा प्रकारची 400 वस्ती क्लिनिक सुरू केले होते. याठिकाणी मोफत उपचार आणि औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हीच संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून पुणे महापालिकेने शहरात 15 ऑगस्ट 2016 रोजी वस्ती क्लिनिक सुरू केले.
शहरात बाणेर, हडपसर, स्वारगेट आणि अन्य एका ठिकाणी वस्ती क्लिनिक सुरू करण्यात आले होते. काही ठिकाणी नगरसेवकांनी मागणी केली. त्यामुळे ती संख्या 18 पेक्षा जास्त झाली. परंतु सद्यस्थितीत ही रुग्णालये बंद स्थितीत आहेत.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आणि गावपातळीवरील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आणि तत्पर वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने “वस्ती क्लिनिक’ योजना सुरू केली. ती योजना सुरू झाल्यापासून तीन वर्षांत 533 रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. या क्लिनिकसाठी एक व्हॅन, एक डॉक्टर, एक नर्स आणि एक सेवक असे पथक तैनात करण्यात आले. ही सेवा चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दिल्लीतील क्लिनिकमध्ये डॉक्टरांना जागा उपलब्ध करून देण्यात येते. डॉक्टरांची निवड प्रशासन स्वत: करते. यासाठी एमबीबीएस पात्रता आवश्यक आहे. निवडलेल्या डॉक्टरांचीच क्लिनिक चालवण्याची जबाबदारी असते. मात्र, महापालिका प्रशासनाने चालवलेल्या या क्लिनिकमध्ये अशाप्रकारच्या अटींचा समावेश नाही.
प्रशासनाचा दावा काय?
लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या योजना महत्त्वाच्या आहेत, त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. “वस्ती क्लिनिक’ योजना गोरगरिबांसाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे. सद्यस्थितीत जरी या योजनेला प्रतिसाद मिळत नसला, तरी भविष्यात या योजनेला संजीवनी देण्यात येणार आहे. ही योजना नगरसेवकांच्या सहकार्यातून पूर्णक्षमतेने राबवली जाणार आहे. यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी वस्ती क्लिनिकची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी पुन्हा वस्ती क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.