नवी मुंबई : मुंबईला जीवनावश्यक गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र आता मसाला मार्केटचा व्यापारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणीनंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे.
भाजी, फळ, कांदा, बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत. दुसरीकडे दाना मार्केटच्या माध्यमातून मुंबईत 2.5 लाख टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याने पुढील एक महिना पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यभरातून आणि परराज्यातून आलेले अन्नधान्य मुंबई, उपनगर, नवी मुंबईत पोहोचविल्यानंतर दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
रविवारी याबाबत माथाडी कामगार, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी प्रशासन बैठक घेवून निर्णय घेणार आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा एपीएमसीमधून मुंबईत करण्यात आल्याने बाजार पुढील काही दिवस बंद राहिला तरी लोकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे.