कराड – तांबवे गावानजीक असलेल्या पवारमळा येथे पिकअप गाडी व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात वसंतगड येथील युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक शंकर शिंदे (वय 19, रा. वसंतगड, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पिकअप गाडी क्रमांक एमएच 04 पीवाय 3894 ही गाडी घेवून चालक सुरज गुरव हे तांबवेमार्गे घारेवाडीच्या दिशेने निघाले होते. यावेळी तांबवे पुलाजवळील पवारमळा याठिकाणी आले असता रस्त्यावर समोरुन दुचाकी क्रमांक एमएच 11 एके 0025 यावरुन आलेले प्रतिक, प्रतिक्षा व राजश्री चंद्रकांत सावंत हे तांबवेहून वसंतगडच्या दिशेने निघाले होते.
यावेळी रिक्षाला ओव्हरटेक करुन पुढे जात असतानाच समोरुन येणारी पिकअप गाडी न दिसल्याने समोरच धडक बसली. यामध्ये प्रतिक हा जागीच ठार झाला. तर प्रतिक्षा शंकर शिंदे (वय 14, रा. वसंतगड, ता. कराड) व गुड्डी चंद्रकांत चव्हाण (वय 10, रा. वारूंजी, ता. कराड) या दोघी जखमी झाल्या. यातील प्रतिक्षा शिंदे ही गंभीर जखमी झाल्याने तिला कराड येथील खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तांबवे पोलिस पाटील पवन गुरव यांनी पोलीसात दिली.