विविधा: वसंत बापट

माधव विद्वांस

सृजनशील कवी, वसंत बापट यांचे आज पुण्यस्मरण. त्यांच्या नावातील वसंत त्यांच्या सदाबहार कवितेत कायम बहरलेला आहे. त्यांचे पूर्ण नाव विश्‍वनाथ वामन बापट. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड येथे 25 जुलै 1922 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील स. प. महाविद्यालयात झाले.

साने गुरुजींच्या सहवासामुळे त्यांच्या विचारांचा बापट यांच्या लेखनावर प्रभाव पडला. ते समाजवादी चळवळीकडे ओढले गेले व अखेरपर्यंत ते सेवादलाशी संबंध ठेवून होते. 1942च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना 1943 ते 1945च्या दरम्यान कारावास भोगावा लागला. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा) ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. त्यांनी 1947 ते 1982 या काळात मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यानच्या काळात 1974 मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्यपदही त्यांनी भूषविले होते.

“बिजली’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यावर त्यांच्या समाजवादी विचारांचा संस्कार दिसून येतो. वसंत बापट 1983 ते 1988 या काळात साधना या साने गुरुजी यांनी चालू केलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचे “गगन सदन तेजोमय’ हे प्रार्थनागीत सर्वांनाच भावले. चीन युद्धाच्या वेळी त्यांनी लिहिलेले “उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू’ व “शिंग फुंकले राणी वाजतात चौघडे’ ही समरगीते लोकांना खूप आवडली होती. पुणे आकाशवाणीने ही दोन्ही गीते प्रसारित केली होती. त्यावेळी लीलाधर हेगडे, दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांनी ते समूहस्वरूपात गायले होते. फुलराणीच्या कविता, फिरकी, परीच्या राज्यात, चंगा मंगा हे त्यांचे बालकवितासंग्रह.

“बालगोविंद’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. 1999 मध्ये मुंबई येथे झालेल्या 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात ते सहभागी झाले होते. काव्यवाचन हा एक सुंदर प्रकार वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या त्रयीने सुरू केला व 40 वर्षें महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी काव्यवाचन केले. या तीनही कवींनी देश विदेशात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. तरुणाईच्या भावना दर्शविणारी अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते तसेच “येशील येशील राणी, पहाटे पहाटे येशील’ सारखी सादगीतेही त्यांनी लिहिली आहेत. घन गर्द कदंबाखाली, अंधारा आली भरती’, सावळा चंद्र राधेचा, मावळला यमुनेवरती’ अशा अनेक भावस्पर्शी कविता त्यांनी लिहिल्या. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांनी नृत्यनाट्ये लिहिली.

“मेघहृदय’ या कवितेतून कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मांडली. “तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, या शब्दांतून त्यांची “सकीना’ उर्दूचा साज घेऊन आली. अबालवृद्धांनाही आवडणारी त्यांची कविता म्हणजे, आगगाडीच्या धकधक लयीने जाणारी दख्खन राणी. सुंदर काव्यरचना करणाऱ्या कविवर्यांना अभिवादन.

Leave A Reply

Your email address will not be published.