वरवरा राव जे जे रुग्णालयात दाखल

एल्गार प्रकरणातील आरोपी, भोवळ आल्याने उपचार सुरू

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेले कवी आणि कार्यकर्ते वरवरा राव यांना भोवळ आल्याने मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

राव (वय 80) गेली दोन वर्षे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय आणि वकिलांनी केली होती.

त्यांना भोवळ आल्याने त्यांना सोमवारी रात्री जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या काही चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे त्यांचे वकील आर. सत्यनारायण यांनी सांगितले.

राव यांनी सोमवारी आपली प्रकृती खालावली असल्याने तात्पुरता जामीन मिळावा. सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल करावे, असे दोन अर्ज मुंबई उच्च न्यायालयापुढे केले होते. त्यांच्या प्रकृतीचा अहवाल न्यायालयाने कारागृह प्रशासनाकडून मागविला होता.

राव यांच्या कुटुंबीयांनी रविवारी कारागृह प्रशासनाला त्यांना वैद्यकीय मदत देण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात त्यांना भेटल्यावर त्यांची प्रकृती नाजूक असल्याची भावना त्यांच्या वकिलांनी व्यक्‍त केली होती.

राव हे गेल्या 22 महिन्यांपासून कारागृहात आहेत. यापूर्वी त्यांनी एनआयए न्यायालयात प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला एनआयएने विरोध केला होता.

बेकायदा प्रतिबंधक कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या गंभीर कलमांखाली त्यांना अटक केली असल्याने 26 जून रोजी एनआयए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर राव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

एल्गार परिषदेच्या प्रकरणातील राव आणि त्यांच्या नऊ साथीदारांवर माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलीस करत होते. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात हा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.