मुंबई – नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेला मुकावे लागणार आहे.
आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात वरुणचा खांदा दुखावला गेला. त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला असल्याने त्याचा या मालिकेतील सहभाग धोक्यात आला आहे.
अमिरातीत सुरू असलेली आयपीएल स्पर्धा संपल्यावर भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. वरुणची भारतीय संघात प्रथमच निवड झाली होती व तो देखील आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास उत्सुक होता. मात्र, आता त्याला दुखापत झाल्याने त्याला संघातील स्थान सोडावे लागणार असून पदार्पणासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीने निवड समितीलाच नव्हे तर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही प्रभावीत केले होते.