दुखापत लपवल्याने वरुण चक्रवर्ती अडचणीत

नवी दिल्ली – भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवड झालेला नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आता चांगलाच संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. खांद्याला झालेली दुखापत बीसीसीआयच्या फिजिओपासून लपवल्याने त्याच्यावर आथा कारवाईही होण्याची शक्‍यता आहे.

अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत वरुण कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने निवड समितीला चांगलेच प्रभावीत केले होते. त्यामुळे नवोदितांना संधी देण्याचे समितीचे धोरण असल्याने त्याला या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले होते. वरुणने यंदाच्या स्पर्धेत 13 सामन्यांत 17 बळी मिळवले होते. त्याला मिस्ट्री स्पिनर म्हणूनही नावाजले गेले. मात्र, त्याने आपल्या खांद्याला झालेली दुखापत लपवल्याचे समोर आल्याने त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड करताना निवड समितीने वरुणची देशांतर्गत तसेच यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीचा विचार करून त्याला टी-20 संघात स्थान दिले होते. निवड समितीला वरुणच्या दुखापतीबद्दल माहिती नव्हती. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

सर्वसाधारणपणे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. दुखापतीमुळे तो चेंडू टाकू शकत नाही. आयपीएल खेळायची होती म्हणून त्याने शस्त्रक्रिया केली नाही. हा दुखापत लपवण्याचाच प्रयत्न आहे असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच त्याच्या दुखापतीबाबत कोलकाता संघानेही माहिती दिली नाही, असा ठपकाही बीसीसीआयने ठेवला आहे.

कोलकाता संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयसह निवड समिती व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीलाही याची माहिती दिली नाही. या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी वरुणला किमान सहा आठवड्यांचा कालावधी आवश्‍यक असल्याचे समोर आल्याने त्याला आता या मालिकेतून वगळण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.