मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत शनिवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाल्या. त्यांची सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. राऊत दाम्पत्याची समोरासमोर चौकशी करण्यात आल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने याआधीच खासदार राऊत यांना अटक केली.
त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. त्यानुसार, वर्षा राऊत चौकशीसाठी दाखल झाल्या. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना त्यांना पत्रकारांनी गाठले. त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीसाठी ईडीने पुन्हा बोलावले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. वर्षा राऊत यांचा जबाब ईडीने नोंदवून घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.