म्हसवड -करोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजर केल्याबद्दल वरकुटे- मलवडी (ता. माण) येथील तीन किराणा दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगाचा गैरफायदा घेऊन जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करत असताना आढळुन आल्याची तक्रार माण तालुका पुरवठा निरीक्षक राहुल जाधव यांनी म्हसवड पोलिसांत दाखल केली असुन संबधित दुकानदारांकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरकुटे- मलवडी या गावात अत्यावश्यक वस्तूंची निर्धारीत किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करत असल्याची तक्रार माणच्या तहसीलदार बाई माने यांना फोनवरून आल्याने त्यांनी वरकुटे मलवडीचे गावकामगार तलाठी गणेश म्हेत्रे, क्लार्क ए. के. पवार व मंडल अधिकारी सुधीर दळवी यांना डमी ग्राहक म्हणून तपासणी करण्यास सांगितले.
त्यानुसार या टिमने पाहणी केली असता वरकुटे-मलवडी येथील श्रध्दा किराणा स्टोअर्सच्या मालक सौ. सारिका जोतिराम जगताप, माणतीर्थ किराणा स्टोअर्सचे मालक सुजीत नारायण फडतरे व स्वामी समर्थ किराणा स्टोअर्सचे मालक गणपतराव भीमराव वाघमोडे हे तिघेही चढ्या दराने विक्री करीत होते. या तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
म्हसवड शहरातही कारवाईची मागणी
शासनाने निर्धारीत केलेल्या किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करत जीवनावश्यक वस्तूंचा म्हसवड शहरातही काळाबाजार सुरू आहे. लॉंकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना म्हसवड शहरातील किराणा दुकानदार जीवनावश्यक वस्तुचा साठा शिल्लक नसल्याचे सांगून चढ्या दराने विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांत असून अशा किराणा दुकानदारांचा मालांचा साठा तपासून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.