मुंबई – देशातील क्रीडा संघटनांसाठी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. खेळाडूंना सराव करता यावा तसेच प्रेक्षकांना प्रवेश न देता मैदाने रिकामी ठेवून स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
करोनाचा धोका निर्माण झाल्यापासून जवळपास दोन महिने सर्व स्पर्धा, सराव तसेच क्रीडाक्षेत्राशी संबंधित काही गोष्टींवर बंधने लावण्यात आली होती. तसेच क्रिकेटसह सर्व क्रीडा स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या होत्या तर काही स्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र, आता लॉकडाऊनमधील काही बंधने उठवण्यात आली आहेत. त्यामुळे खेळाडूंना प्रत्यक्ष क्रीडा संकुलात किंवा मैदानात जाऊन सराव तर करता येणारच आहे क्रिकेटसह विविध संघटनांना स्पर्धा देखील आयोजित करता येणार आहेत. खेळाडूंचा सराव, तंदुरुस्तीसाठीचा व्यायाम आणि स्पर्धा अशा टप्प्यांनी सर्व व्यवस्थापन रुळावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. येत्या काळातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून वेळोवेळी त्याबाबत संघटनांनाही सूचना करण्यात येणार आहेत.