मंचर, (प्रतिनिधी) – तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आलेली व या वर्षातील एकमेव अंगारक चतुर्थी मंगळवार, दि. २५ रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
२०२३ साली एकही अंगारक चतुर्थी नव्हती. तर यावर्षी एकमेव असलेली अंगारक चतुर्थी मंगळवार, दि. २५ रोजी होणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर अंगारक चतुर्थीचा योग आला आहे. यानिमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थानात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे पाच ते सहा महापूजा, सहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक व त्यानंतर आरती होणार आहे. सकाळी नऊ वाजता मंचर येथील विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळाचे ५१ वारकरी पारायण करणार आहेत. त्यानंतर भाविकांना खिचडी वाटप केले जाईल. सकाळी ११ वाजता निघोटवाडी येथील जय हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे भजन होईल.
दुपारी तीन वाजता आरती झाल्यानंतर भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी सात वाजता मुख्य आरती होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता संत सावता महाराज प्रासादिक भजन मंडळाचे भजन होईल. चंद्रोदय झाल्यानंतर श्रीस नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान अंगारक चतुर्थीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या पायथ्यापर्यंत लाकडी बॅरिकेट्स लावून दर्शन रांग बनवण्यात आली आहे.
पावसापासून संरक्षणासाठी मंदिर परिसरात व दर्शन रांगेवर तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्यात आले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त बरोबर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी व प्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.