चिंबळी – खेडचे स्व. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या प्रथम पुण्यास्मरण दिनाच्या निमित्त रविवारी (दि. 10) चाकण येथे महाआरोग्य शिबिर, करोना योद्धे सन्मान, कीर्तन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी मंत्री व शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रवींद्र मिर्लेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी दिली.
माजी आमदार स्व. गोरे यांच्या चाकण येथील जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी (दि. 10) सकाळी 10 ते दुपारी या वेळेत नेत्रतपासणी, दंततपासणी, हृदयविकार, कान, नाक, घसा, मधुमेह, रक्तदाब, हाडांची ठिसूळता, रक्त तपासणी अशा विविध आजारांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दुपारी 3 ते 4 यावेळेत मागील संपूर्ण कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेड तालुक्यातील करोना योद्ध्यांचा सन्मान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विमा कार्ड वाटप, प्रत्येक कुटुंबासाठी मोफत 5 लाखांच्या अपघात विमा पॉलिसीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांचा कीर्तन सोहळा होणार आहे.