भारत बंदबाबत पुण्यातील महा विकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

 

पुणे – केंद्र सरकारच्या कृषी विषयक विधेयकांना विरोध करण्यासाठी मंगळवारच्या भारत बंदमध्ये महाविकास आघाडी, पुरोगामी पक्ष आणि इतर सामाजिक आणि कामगार संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

कॉंग्रेस भवन येथे या तिनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष आमदार चेतन तुपे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे रघुनाथ कुचिक, अंग मेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार, माकपचे सरचिटणीस अजित अभ्यंकर, शेकापचे सागर आल्हाट, लोकायतचे निरज जैन, दगडखाण कामगार परिषदेचे बी. एम. रेगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत बधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

पुण्यात हमाल पंचायत, दि. पूना मर्चंटस चेंबर्स, पुणे पेट्रोल आणि डिझेल असोसिएशन, मार्केटयार्ड कामगार युनियन, पुणे व्यापारी संघटना, पीएमपी इंटक आणि अन्य कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंददरम्यान सकाळी साडेदहा वाजता टिळक चौकातून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे मोर्चा काढला जाणार आहे, असे निवेदन बैठकीनंतर महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष आणि उपस्थित संघटनांनी शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या माध्यमांतून प्रसिद्धीला दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.