वाई – वाई शहरात डेंगी व साथीच्या इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नगर परिषदेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.पावसाळ्यामुळे शहरात डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. डेंगी व साथरोग पसरू नयेत, यासाठी नगर परिषदेच्यावतीने शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रिक्षा आणि घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून जनजागृती केली जात आहे. वैद्यकीय पथक, सर्वेक्षण पथक, औषध फवारणी (फॉगिंग) पथक अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहितीपत्रके घरोघरी दिली जात आहे. संपूर्ण शहरात तीन फॉगिंग मशीनच्या साहाय्याने धूर फवारणी करण्यात आली असून, गरज भासेल तेथे धूर फवारणी केली जात आहे. नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयामार्फत सर्वेक्षण करून, ठिकठिकाणी अॅबेट व इतर जंतुनाशक औषधे टाकली जात आहेत. साथरोगांबाबत माहिती देणारे फ्लेक्स शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयमार्फत साथरोगांबाबत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय नागरिकांच्या बैठका घेऊन माहिती दिली जात आहे.
पाणी साचून देऊ नये आणि डेंगीबाबत सूचना फलक लावण्यासाठी शहरातील हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. शहरातील उघड्या गटारांची स्वच्छता, जंतुनाशकांचा वापर करण्यात येत आहे. डेंगीच्या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार होण्यासाठी नगर परिषदेने निर्देश दिले आहेत.
शहरात साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबद्दल नागरिकांमधून समाधान होत आहे. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवून, सहकार्य करावे.
– संजीवनी दळवी, प्रशासक, वाई नगर परिषद.