अंगण सजवणाऱ्या रांगोळीतही विविध रंगसंगती

सोशल मीडियाही ठरतोय डिझाईन्ससाठी मार्गदर्शक  

कराड  – कोणताही सण-समारंभ म्हंटला की दारात रांगोळी ही आलीच. पूर्वी दररोज अंगणात रांगोळी काढली जायची. परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात तेवढा वेळ कोणाकडे आहे. परंतु सण-समारंभात मात्र ही कला जपण्याचा प्रयत्न केला जातो. दीपावलीच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत विविध रंगातील रांगोळी उपलब्ध झाली असून खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी होत आहे. सध्या सोशल मिडीयावरून रांगोळीचे अनेक प्रकार असणारे व्हिडीयो व्हायरल होत आहेत. हेच व्हिडीयो आजच्या तरूणींना रांगोळीसाठी मार्गदर्शकही ठरत आहेत.

हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला कला प्रकार म्हणजे रांगोळी. सुमारे दोन हजार वर्षाचा इतिहास या रांगोळीमागे आहे, असं मानलं जातं. प्रांतानुसार रांगोळीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याची नावंही वेगवेगळी आहेत. रांगोळीनं मुख्यत्वे स्त्रियांना आकर्षित करून घेतलं असलं, तरी आता मात्र पुरुषही रांगोळीला आपलं म्हणत असून ते एक अर्थाजनाचे साधन बनले आहे. अगदी तरुण मुलंही रांगोळीच्या क्षेत्रात आपली वेगळी “छाप’ उमटवत आहेत.

रांगोळी आणि दिवाळीचे वेगळे नाते आहे. दिवाळीत रांगोळीच्या पायघड्या घालण्याची प्रथा आहे. हल्ली वेळेअभावी रांगोळी काढायला पुरेसा वेळ देता येत नाही. संस्कारभारती रांगोळीसाठी तसा खूप वेळ द्यावा लागतो. आजकालच्या फास्ट जमान्यात कोणाकडे वेळही नाही त्यामुळे ठिपक्‍यांची रांगोळी पुन्हा पुढे येवू लागली आहे. गेल्या दोन वर्षात ठिपक्‍यांची रांगोळी व संस्कारभारती यांचे कॉम्बिनेशन करून युवतींनी त्याला नवा लुक देण्याचा प्रयत्न केला असून या लुकला सोशल मिडीयावरही लाईक मिळताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल होणारे विविध डिझाइन्सच्या रांगोळीचे व्हिडीओच अनेक तरूणींना रांगोळी काढण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यामुळे आता सणोत्सवात घरोघरी नव्या लुकमधील रांगोळ्या दिसू लागल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.