पुणे – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनी शहर-उपनगरांतील विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी ध्वजवंदन सोहळा आयोजित केला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हा सोहळा साधेपणाने पार पडला.
अभिनव एज्युकेशन सोसायटी
आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये 75 वा स्वातंत्र्यदिन समारंभ साधेपणाने साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक
राजीव जगताप, सहसेक्रेटरी
निर्मोही जगताप, डॉ. सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, ऍड. दिलीप जगताप, संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संगीत विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. विद्यार्थ्यांना संगीत विभागप्रमुख बिपीन इथापे आणि सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सिद्धी देशपांडे आणि श्रेया शेंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख आणि प्रास्ताविक विनोदकुमार बंगाळे यांनी केले.सूत्रसंचालन कुमुदिनी घोरपडे, तर वर्षिनी गिरीश हिने आभार मानले.
स्वयंभू फाउंडेशनतर्फे चिमुकल्यांचे लसीकरण
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी इन्फ्लूएंजा लसीकरण स्वयंभू फाउंडेशनतर्फे मोफत करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजप मध्य हवेली उपाध्यक्ष संतोष हरपळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. हरपळे यांच्या हस्ते ढमाळवाडी, पापडे वस्ती येथील मारुती एन्क्लेव या सोसायटीत लसीकरणाचे पास देण्यात आले. सोसायटीतील 50 मुलांचे मोफत लसीकरण केल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन कपिल खुराणा यांनी संतोष हरपळे यांचे आभार मानले. या पास वाटपावेळी स्वयंभू फाउंडेशनचे पदाधिकारी व मारुती एन्क्लेव सोसायटीतील सभासद उपस्थित होते.
साधना विद्यालय येथे ध्वजवंदन
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी रक्त सांडले. त्यामुळे आज भारत देशात स्वातंत्र्याची भव्य इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले. साधना विद्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य विजय शितोळे, अरविंद तुपे, अशोक तुपे, एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, लेफ्टनंट रमेश गावडे, एनएसएस प्रमुख डॉ. संजय जगताप, गजानन बडवे, उपमुख्याध्यापक नवनाथ कुंभार, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, तमन्ना सय्यद, झीनत सय्यद, पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी केले. तर ध्वजसंचलन एनसीसी ऑफिसर लालासाहेब खलाटे, आरएसपी पुणे जिल्हा समादेशक रमेश महाडिक यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ, प्रताप गायकवाड व रूपाली सोनावळे यांनी केले.
नऱ्हेगाव येथे वृक्षवाटप उपक्रम
नऱ्हेगाव येथे भाजप व सुशांत सुरेश कुटे जनसंपर्क कार्यालय येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले. जि.प सदस्या जयश्री भूमकर, माजी ग्रा.पं सदस्य बाबासाहेब कुटे, प्रदीप कुटे, संगीता कुटे, अनिता कुटे यांच्या हस्ते वृक्षवाटप करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सचिव कोमल कुटे, माजी उपसरपंच सागर भूमकर, सतीश कुटे, अक्षय इंगळे, चैत्राली कुटे,तेजस कुटे, झाडे लावा झाडे जगवा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
जगद्गुरू इंटरनॅशनल स्कूल
विश्रांतवाडी येथील स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीते, महापुरुषांच्या भूमिका व नृत्ये सादर केली. संस्थेचे संस्थापक चेअरमन बंडू खांदवे यांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे कौतुक केले. यावेळी डॉ. विशाल साठे व डॉ. कांचन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. डॉ. विठ्ठल बिराजदार व सिस्टर सलोनी चव्हाण यांचा करोना लसीकरण सेवेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. उपमुख्याध्यापिका आरती शर्मा, समन्वयक मर्लिन मॅथ्यू, जनसंपर्क प्रमुख प्रा. प्रकाश दळवी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व संयोजन सहाय्य केले. यावेळी शांताराम खांदवे, मोहन खांदवे, संदीप मोझे, संजय मुरकुटे, गणेश दौंडकर आदी उपस्थित होते.