विविधा : वसंत रामजी खानोलकर

– माधव विद्वांस

आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक पद्मभूषण डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 13 एप्रिल, 1895 रोजी रत्नागिरीजवळच्या मठ या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील डॉ. रामजी खानोलकर तत्कालीन लष्करात कंदहार येथे शल्यचिकित्सक (सर्जन) होते. लष्करी कामगिरी पूर्ण झाल्यावर हिंदुस्थानात परत येत असताना वाटेत ते सध्याच्या पाकिस्तानातील क्‍वेट्टा या ठिकाणी थांबले होते. क्‍वेट्टा हे गाव त्यांना इतके आवडले की तेथेच त्यांनी वास्तव्य करायचे ठरविले. 

त्यामुळे त्यांच्या चिरंजिवांचे डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचे शालेय शिक्षण क्‍वेट्टा येथेच झाले. वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्‍टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या 17व्या वर्षी ते मुंबईला ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे वर्ष 1918 मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. 1923 मध्ये ते रोगनिदानशास्त्रात (पॅथॉलॉजी) एम. डी. झाले. या काळात त्यांनी मूलभूत विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनाचा अनुभव मिळवला.

भारतात परत आल्यावर ते ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोगनिदानशास्त्र शिकवू लागले. त्यासाठी उपयुक्‍त विविध नमुन्यांचे संग्रहालयपण त्यांनी सुरू केले. डॉक्‍टरांना बऱ्याचदा पेशंट, तसेच ऊती किंवा पेशींची छायाचित्रे घ्यावी लागतात. त्यासाठी डॉ. खानोलकरांनी प्रथमच छायाचित्रण विभागही सुरू केला. रोगनिदानशास्त्राच्या शिक्षणाची योग्य प्रकारे सुरुवात त्यांनी केली. रोगनिदानशास्त्रातील संशोधन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पाश्‍चात्य देशातील वैद्यकीय शिक्षणाप्रमाणेच भारतीय शिक्षणाचा दर्जा वाढावा तसेच वैद्यकीय शिक्षणामध्ये मूलभूत विज्ञान, प्रायोगिक जीवशास्त्र (एक्‍सपेरिमेंटल बायोलॉजी), जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकशास्त्र तसेच संख्याशास्त्र यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवले.

दरम्यान वर्ष 1935 मध्ये क्‍वेट्टा येथे झालेल्या भयानक भूकंपात रामजी आणि त्यांच्या परिवारातील 14 जण मृत्युमुखी पडले. या संकटाला त्यांनी धीराने तोंड दिले. त्यांच्या वडिलांचा संस्कृत व इतर भाषांतील मौल्यवान ग्रंथसंग्रह डॉ. खानोलकरांनी मुंबई विद्यापीठास प्रदान केला.

जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र या विषयांची सुरुवात त्यांनी मुंबई विद्यपीठात केली. त्यांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशातून अंग काढून घेतले आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदानतज्ज्ञ म्हणून 1941 मध्ये ते रुजू झाले. त्यांनी कर्करोग, कुष्ठरोग, पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र, मानवी अनुवंशशास्त्र या विषयात संशोधन केले.

मुख्यत्वे कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधनसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार सरकारने या कामासाठी अमेरिकेहून ई. व्ही. कॉद्रे यांनाही बोलाविले होते. सर्वानुमते खानोलकरांना संशोधनासाठी एक राष्ट्रीय प्रयोगशाळा देण्यात यावी असे ठरले. त्याप्रमाणे वर्ष 1952 मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. यासाठी रॉकफेलर फाउंडेशनसह अनेक जागतिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळाले. 29 ऑक्‍टोबर, 1978 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.