विविधा : श्रीधर बाळकृष्ण रानडे

– माधव विद्वांस
बालसाहित्यिक, विज्ञान लेखक तसेच खंडकाव्य आणि स्फूट कविता या प्रकारात काव्य करणारे रविकिरण मंडळाचे एक संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म नागपूर येथे 24 जून 1892 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले. त्यांनी मुंबई येथे बीए व एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले. एमएस्सी झाल्यावर मुंबईतील इस्माइल युसुफ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबाई हे दाम्पत्य कवी होते.
या दोघांनी लिहिलेल्या कवितासंग्रह “श्रीमनोरमा’ या नावाने प्रसिद्ध आहे. या संग्रहात श्रीधर यांच्या सुमारे 75 व मनोरमाबाईंच्या 92 कवितांचा समावेश आहे. श्रीधर आणि मनोरमा (विवाहापूर्वी द्वारकाबाई हिवरगावकर) हे दोघेही फर्गसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ते बरेचदा एकाच वर्गात असत. महाविद्यालयाच्या मासिकातून दोघांनीही लिहिलेल्या कवितांच्या निमित्ताने दोघांचा घनिष्ठ परिचय झाला. परिचयानंतर दोघांचेही साहित्य व प्रेमही वाढत गेले व दोघे विवाहबद्ध झाले. आपल्या पत्नीच्या वयाच्या अवघ्या 29 व्यावर्षी अकाली निधनानंतर श्रीधर रानडेंनी काव्यलेखन सोडले.
1920 ते 23 या काळात जे काही कवी पुण्यात वास्तव्य करीत होते. त्यातील काही कवींनी एका मंडळाची निर्मिती वर्ष 1923 मध्ये केली. त्यांच्या “सन-टी-क्लब’ मध्ये दर रविवारी एका सदस्याचे घरी जमून कवितांचे वाचन वा गायन करावयाचे आणि त्यावर चर्चा करावयाची हा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असे. यातूनच “रविकिरण मंडळ’ स्थापन झाले. त्यावेळी मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा होता. या मंडळाच्या स्थापनेच्या वेळी श्रीधर बाळकृष्ण रानडे, मनोरमाबाई रानडे, माधव ज्युलियन, यशवंत, गिरीश, ग. त्र्यं. माडखोलकर, द. ल. गोखले आणि दिवाकर असे एकूण आठ सदस्य होते.
दिवाकर हे मंडळ सोडून गेल्यावर त्यांच्या जागी विठ्ठल दत्तात्रय घाटे यांना घेण्यात आले. मंडळात सात पुरुष व एक स्त्री, म्हणून अरुंधतीसह “सप्तर्षी’ हे मंडळाचे प्रतीक बनले. हे मंडळ 1935 पर्यंत कार्यरत होते. पाश्चात्य साहित्यावरून प्रेरणा घेऊन मराठीतील पहिली विज्ञानकथा त्यांनी 1915 मध्ये लिहिली. त्यांनी तिंबूनानांचा रेडिओ, दिवाळीची डाली ही नाट्ये लिहिली. तसेच कुंपणावरून, बोबडकांदा, कवडसा, गोपाळकृष्ण, चिक्कूमामा, येरेयेरे पावसा, असे बालसाहित्याचे लेखन केले.
त्यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांच्या भावविश्वाशी व विचारांशी एकरूप होणारे होते. त्यामुळे ढेकूण, डास, झुरळ, माशी हेसुद्धा त्यांच्या कवितांचे विषय होते. कॉलऱ्याने आजारी असताना बालपणापासूनच्या अनेक आठवणी व स्वप्ने त्यांच्या डोळ्यांसमोरून गेली. आपण मरण पावलो असा भासही त्यांना झाला व त्यातून या सर्व मनःस्थितीचे दर्शन घडविणारे “काळाच्या दाढेतून’ हे खंडकाव्य त्यांनी लिहिले. ते 1915 साली प्रसिद्ध झाले. दिवस सुगीचे सुरू जाहले।। ओला चारा बैल माजले।। शेतकरी मन प्रसन्न जाहले।। छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्, लेझिम चाले जोरात।। हे लोकप्रिय समूह गीत श्रीधर यांनी रचले आहे. 21 मार्च 1984 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.





