जलरंग व तैलरंग या दोन्ही प्रकारच्या चित्रकलेमध्ये तरबेज असलेले चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सावंतवाडी येथे 25 नोव्हेंबर 1882 रोजी झाला. ते तीन वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले, त्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी चित्रकलेतील ग्रेड (श्रेणी) परीक्षेतही विशेष नैपुण्य मिळविले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यांचे चित्रकला शिक्षक एन. एस. मालणकर यांनी त्यांना ग्रेडच्या परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
वर्ष 1903 मध्ये चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले आणि त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले. प्रवेश परीक्षेच्या वेळी त्यांना उंदराचे चित्र काढण्यास सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी उंदरांची सभाच चितारली. ते पाहूनच सर्व शिक्षक चकित झाले. जे. जे. स्कूलमधील शैक्षणिक काळात त्यांना गणपतराव केदारी, सेसील बर्न्स, आगासकर, त्रिंदाद, वॉल्टर रोबोथॅम आदी मातब्बर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. वर्ष 1906 पासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रकाश व सावलीच्या छटा ते परिणामकारक उमटवीत असत. तसेच रंगातील गडदपणा व फिकेपणा हा अत्यंत खुबीने साकारीत. भारताच्या विविध भागातील पोशाख व्यक्तिचित्रातील चेहऱ्यावरचे हावभावही अत्यंत सुरेख रंगविलेले होते.
वर्ष 1906 ते 1958 या कालावधीमध्ये मुंबईतील “बॉंबे आर्ट सोसायटी’ व “आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ यांच्या कलादालनात त्यांची चित्रे हमखास असायचीच. त्यांनी काढलेली अनेक चित्रे देश विदेशातील संग्रहालयात लक्ष वेधून घेतात. “वूमन विथ लॅम्प’ (ग्लो ऑफ होप) असे शीर्षक असलेले त्यांचे चित्र म्हैसूर येथील जगनमोहन पॅलेस येथे श्रीजयचमराजेंद्र आर्ट गॅलरीमध्ये आहे. खालून येणारा दिव्याचा मंद प्रकाश त्या युवतीच्या मुखावर दाखविण्याची अजब रंगसंगती पाहून बघणारा स्तब्ध होऊन पाहातच राहतो. वर्ष 1964 मध्ये त्यांनी चितारलेल्या पं. मदनमोहन मालवीय यांच्या व्यक्तिचित्राचा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून गौरव करण्यात आला होता.
“आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था वर्ष 1918 मध्ये स्थापन केली. आजही ही संस्था कार्यरत आहे. वर्ष 1940 मध्ये गिरगाव येथे “हळदणकर फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्यांचे चिरंजीव गजानन हळदणकर हेही चित्रकार होते. 30 मे 1968 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिवादन.
– माधव विद्वांस