– माधव विद्वांस
राजकपूर यांचा ‘बॉबी’ चित्रपट वर्ष 1973 मधे प्रदर्शित झाला आणि रूपेरी पडद्यावर मोठी क्रांती झाली. वयाच्या चाळीशीपर्यंत नायिकेची भूमिका करणार्या अभिनेत्री आईच्या व सासूच्या भूमिकेत गेल्या. वयाच्या 14व्या वर्षी यशस्वी अभिनेत्री बनणार्या डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वडिलांच्या प्रयत्नामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची पहिली संधी मिळाली. डिंपल यांचा जन्म 8 जून 1957 रोजी मुंबईत गुजराती खोजा (आगाखान यांचे अनुयायी) व्यापारी चुनीभाई कपाडिया आणि त्यांची पत्नी बिट्टी यांच्या पोटी झाला. त्यांना बेट्टी म्हणून ओळखले जायचे.
डिंपलने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासूनच चित्रपटाचे आकर्षण होते व अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते. वर्ष 1971 मध्ये तिच्या पहिल्या चित्रपट ‘बॉबी’साठी त्यांनी चित्रपटामधे अभिनेत्री म्हणून काम केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. 30 वर्षांच्या राजेश खन्नाची त्या चाहती असल्याने त्यांच्या प्रेमात पडल्या व त्यांनी त्यांच्याशी लग्न केले. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असल्याचे सांगितले.
27 मार्च 1973 रोजी जुहू येथील त्यांच्या वडिलांच्या बंगल्यात आर्य समाजाच्या संस्कारानुसार त्यांचा विवाह पार पडला. पती राजेश खन्नाच्या सांगण्यावरून त्यांनी लग्नानंतर चित्रपटात अभिनय करण्याचे सोडून दिले. त्यानंतर त्यांनी ट्विंकल (जन्म 1974) आणि रिंकू (जन्म 1977) या दोन मुलींना जन्म दिला.
डिंपल राजेश यांच्यात सुरुवातीपासूनच संसारात कटुता येऊ लागली व 10 वर्षांनंतर वर्ष 1982 मध्ये राजेश खन्नापासून वेगळे होऊन त्या आपल्या दोन मुलींसह माहेरी परतल्या. मात्र, त्यांचा अधिकृतपणे कधीच घटस्फोट झाला नव्हता. वर्ष 1985 मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, आमच्या घरातील जीवन आणि आनंद ज्या दिवशी माझे आणि राजेशचे लग्न झाले त्याच दिवशी संपुष्टात आले होते.
राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी डिंपल वर्ष 1984 मध्ये चित्रपटांमध्ये परतल्या व ‘सागर’ या चित्रपटापासून पुनरागमन केले. त्यांच्या सुरुवातीच्या भूमिका अनेकदा त्यांचे आकर्षक सौंदर्य आणि बिनधास्त उत्तान अभिनयावर अवलंबून असत. मात्र, डिंपल यांनी यात बदल करून स्वतःला आव्हान देण्यासाठी आणि आपली श्रेणी विस्तृत करण्यास उत्सुक होत्या. त्यांनी सोसलेल्या वैयक्तिक अनुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या अभिनयात त्या दाखवू लागल्या. त्यामुळे सिनेमात अधिक नाट्यमय भूमिका घेतल्यामुळे समीक्षकांची त्यांना अधिक पसंती मिळाली.
त्यांना ‘काश, दृष्टी, लेकीन, आणि रुदाली’मधील त्यांच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली. रुदालीमधील व्यावसायिक शोककर्त्याच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला. प्रहार, अंगार, गर्दिश आणि क्रांतिवीर या गुन्हेगारी नाटकांमध्येही त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या. त्यांनी जय शिव शंकर 1990 या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केले.
डिंपल कलाप्रेमी असून त्यांना चित्रकला, शिल्पकलेची आवड आहे. त्यांनी वर्ष 1998 मधे ढहश ऋरीरुरू ढीशश नावाची कंपनी काढली व त्यामार्फत स्वतःच केलेल्या वस्तू त्या विकत. त्यांनी अनेक प्रदर्शनात भाग घेऊन अनेक प्रकारच्या मेणबत्त्यांचे वेगवेगळे आकर्षक नमुने ग्राहकांना दाखविले. त्यांनी वेल्सला जाऊन ब्लॅकवुड-आधारित मेणबत्ती कलाकार डेव्हिड कॉन्स्टेबल यांच्यासोबत कार्यशाळा घेतली.