विविधा : चार्ली चॅपलिन

– माधव विद्वांस

विनोदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, निर्माता अशी ख्याती असणारे चार्ली चॅपलिन यांची उद्या जयंती. त्यांचे पूर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन. पण त्यांचे चाहते त्यांना चार्ली चॅपलिन या नावाने ओळखू लागले. मूक चित्रपटांच्या जमान्यातच ते पडद्यावर आले. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी विनोद जागृत केला व जागतिक पातळीवर त्यांचे नाव विनोदी अभिनेता म्हणून सर्वदूर झाले.

त्यांचा जन्म 16 एप्रिल, 1889 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे आई आणि वडील दोघेही गायक आणि अभिनेते होते. आई “लीली हार्ले’ या नावाने अभिनेत्री आणि गायिका म्हणून प्रसिद्ध होती. जगाला हसण्याची दिशा देणाऱ्या या कलंदर कलाकाराचे बालपण मात्र खूपच क्‍लेशकारक होते. त्यांचे वडील त्यांच्यापासून दूर होते. आई कष्ट करून त्यांचे पालनपोषण करण्याचा प्रयत्न करीत होती.

चार्लीला त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी मोलमजुरी करण्यासाठी बाहेर पडावे लागले होते. त्यातच त्यांच्या आईचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिला मनोरुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांच्या आईचे निधन झाले. चार्ली व त्यांचा भाऊ यांना त्यांच्या वडिलांकडे पाठविले; पण त्यांचे व्यसनाधीनतेमुळे निधन झाले. बालकामगार म्हणून त्यांना मोलमजुरी करावी लागली.

“मला संकटांचा अर्थही कळत नव्हता कारण आम्ही सतत संकटात राहात होतो आणि मी लहान असल्यामुळे ते विसरूनही गेलो. मी माझ्या आईच्या आजारपणात काहीही करू शकलो नाही’, ही खंत त्यांनी व्यक्‍त केली होती, यावरून त्यांच्या परिस्थितीची कल्पना येते. चॅपलिनने अगदी लहान वयातच फिरत्या म्युझिक कंपनीबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती. संगीतक्षेत्रातील शिक्षण नसताना ते उत्कृष्ट प्रकारे व्हायोलियनसारखी वाद्ये वाजवीत. चरितार्थासाठी त्यांनी अंगभूत अभिनय गुणाचा आधार घेऊन आपला भाऊ सिडनी याच्यासह लहान मुलांच्या नाट्यसमूहातून व्यावसायिक रंगमंचावर पहिलं पाऊल टाकलं आणि अल्पावधीतच ते टॉप डान्सर म्हणून प्रसिद्ध झाले.

वयाच्या बाराव्या वर्षी “शेरलॉक होम्स’ या प्रसिद्ध नाटकात “बिली’ हे पात्र त्यांनी रंगवून अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर कॉमेडियन स्टेज ऍक्‍टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या 19व्या वर्षी त्यांना प्रतिष्ठित फ्रेड कार्नो कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली व त्यांना कंपनीबरोबर अमेरिकेत जाण्याचा योग्य आला. वर्ष 1921मध्ये प्रदर्शित झालेला “द किड’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ चार्ली असे होते. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीत, अभिनेता चार्लीच होते.

1 डिसेंबर 2011 मध्ये, किड लायब्ररी ऑफ कॉंग्रेसच्या नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये संरक्षित करण्यासाठी निवडले गेले. रजिस्ट्रीने म्हटले आहे की हा चित्रपट टचिंग ड्रामा, सोशल कमेंट्री आणि इनव्हेंटिव्ह कॉमेडीचे एक कलात्मक मिश्रण आहे आणि चॅपलिनच्या नेहमीच्या लहान विषयांच्या पलीकडे आपली कलात्मकता टिकवून ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. कलाकार म्हणून यशस्वी होताना त्यांचे कौटुंबिक जीवनही विस्कळीत होते. त्यांनी एकूण चार लग्न केली व त्यांना एकूण 9 मुले झाली. या कलाकाराचे 25 डिसेंबर 1977 रोजी निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.