विविधा: केशवराव जेधे

माधव विद्वांस
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, संपादक, खेडोपाडी कॉंग्रेस पोचविणारे आणि संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचे नेते केशवराव मारुतराव जेधे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1896 रोजी पुणे येथे झाला. त्यांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जायचे. जेधे कुटुंब महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे पाठीराखे होते. 1920च्या दशकात बहुजन समाजातील युवकांसाठी जेधे मॅन्शन एक राजकीय आणि सामाजिक शाळा म्हणून उदयास आली.

पुण्यात आल्यावर सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते थेट जेधे मॅन्शनकडे जात असत. गोवा मुक्‍ती आंदोलन आणि संयुक्‍त महाराष्ट्र आंदोलनावर जेधे मॅन्शनमधेच अनेक बैठका झाल्या होत्या. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि वर्ष 1923 मध्ये त्याच्या प्रचारार्थ “शिवस्मारक’ हे साप्ताहिक काढले. नंतर “मजूर’ हे वर्तमानपत्र काढून सत्यशोधक समाजाच्या विचारप्रणालीचा प्रचार केला. वर्ष 1927 मध्ये “कैवारी’ या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणूनही निवडून गेले होते.

पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा त्यांच्या प्रयत्नातूनच उभा राहिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे 1930 नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली. बहुजन समाजाचा पाठिंबा कॉंग्रेसला मिळाला आणि बॉम्बे प्रेसिडेंसीच्या विधानपरिषदेसाठी नोव्हेंबर 1934 मध्ये पहिली निवडणूक जिंकली. 1938 मध्ये ते प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.

त्यांच्या कारकिर्दीमध्येच पुण्याचे कॉंग्रेस भवन उभे राहिले. मात्र पक्षाचा केंद्र बिंदू जेधे मॅन्शन भोवतीच होता. महात्मा गांधीजींच्या पश्‍चात त्यांनी शेतकरी व कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ऑगस्ट 1952 मध्ये ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले. वर्ष 1948 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने भाषिक राज्यं देण्याचे वचन दिले होते, परंतु राज्य पुनर्गठन समितीने महाराष्ट्र-गुजरातसाठी द्विभाषिक राज्याची शिफारस केली आणि मुंबई राजधानी म्हणून घोषित केली. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला आणि केशवराव जेधे यांच्या नेतृत्वात पुण्यात सर्वपक्षीय बैठक झाली आणि संयुक्‍त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी झाली.

दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत संयुक्‍त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्रात मुंबईतील 12 जागांसह 133 पैकी 101 जागा जिंकल्या, मात्र गुजरात, मराठवाडा विदर्भाच्या पाठिंब्याने कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकली. यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. मात्र जेधे, एस. एम. जोशी, एस. ए. डांगे, एन. जी. गोरे आणि पी. के. अत्रे यांनी संयुक्‍त महाराष्ट्रासाठी चळवळ उभी केली. यात अनेकांचे बळीही गेले. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनीही राजीनामा दिला. अखेर कॉंग्रेस हायकमांडने पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. 12 एप्रिल 1959 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)