#लोकसभा2019 : वाराणसीत मोदींची मते वाढणार?

विरोधी पक्षांचे उमेदवार तुलनेने कमकुवत असल्याचा परिणाम

वाराणसी – वाराणसीत नरेंद्र मोदी यांचे मताधिक्‍य वाढण्याची शक्‍यता आहे. समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्याने मोदींच्या मताधिक्‍याचीच उत्सुकता आहे. मोदींसमोर शड्डू ठोकण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे. शिवाय, प्रियांका गांधी-वढेरा वाराणसीतून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांमधील उत्साहाला ओहोटी लागली आहे.

विरोधक कमकुवत असल्याने ते मोदींना आव्हान देण्यास असमर्थ आहेत. समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे. परंतु सपने माजी आमदार सुरेंद्र पटेल यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असाही मतप्रवाह आहे. या दोन्ही मतदारसंघात कुर्मी समाज बहुसंख्य असून अपना दलाचा प्रभाव आहे.

2017 मध्ये अपना दलाच्या उमेदवाराने पटेल यांचा पराभव केला होता. पण, विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सपने पटेल यांना मोदींच्या विरोधात उभे केले असते, तर कुर्मीबहुल विधानसभा मतदारसंघात पटेल यांनी मतांची आघाडी घेतली असती. मोदींच्या विरोधात तगडा उमेदवार दिला असता तर कुर्मीच नव्हे यादव, मुस्लीम, दलित या मतदारांनीही पटेल यांना मतदान केले असते.

मोदींच्या विरोधात कमकुवत उमेदवार दिल्याने मुस्लिमांमध्ये संभ्रम आहे. वाराणसी मतदारसंघात ब्राह्मण, ठाकूर आदी उच्चवर्णीय, ओबीसींमध्ये कुर्मी तसेच, वैश्‍य, खत्री हे समाज मोदींच्या मागे उभे आहेत. बुथ स्तरावरील कार्यकर्ता बेसावध राहू नये याची दक्षता भाजप घेत आहे. 2014 मध्ये मोदी याना 5 लाख 81 हजार, अरविंद केजरीवाल यांना 2 लाख 09 हजार, कॉंग्रेसचे अजय राय 75,614, बसपाचे विजय जयस्वाल 60,579, सपचे कैलास चौरसिया यांना 45,291 मते मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.