“शुद्ध देसी रोमांस’मधून सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी वाणी कपूर लवकरच अक्षयकुमारची नायिका बनणार आहे. अक्षयकुमारच्या “बेल बॉटम’मध्ये ती मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती खुद्द वाणी कपूरने दिली आहे. “शुद्ध देसी रोमांस’मध्ये वाणी पहिल्यांदा सुशांतसोबत दिसली होती आणि त्यानंतर ती हृतिक रोशन-टायगर श्रॉफच्या “वॉर’मध्ये झळकली होती.
वाणी कपूरने अक्षयकुमारसोबतचे “बेल बॉटम’मधील काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, मी खूप उत्साहित आहे. टीमिंग अप विथ द वन एंड ओनली @akshaykumar सर. आता प्रतीक्षा करू शकत नाही!! “# बेल बॉटम लवकरच सुरू करूया.’
“बेल बॉटम’ हा चित्रपट 80च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात वाणी पहिल्यांदाच अक्षयकुमारसोबत काम करणार आहे. रणजित एम. तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे.