नवी दिल्ली – देशातील सर्वात वेगवान 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे दोन नवीन संच ऑगस्टमध्ये चाचणीसाठी ट्रॅकवर उतरणार आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये वंदे भारत ट्रेन सुरु होईल. अधिकृत माहितीनुसार, वंदे भारत ही ट्रेन सुमारे 115 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत गाड्या तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अधिका-यांनी सांगितले की अशा दोन गाड्या आधीच दिल्ली ते कटरा आणि दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावत आहेत. तसेच आता आत्याधुनिक सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुविधांच्या दृष्टीने या ट्रेनच्या 75 प्रगत हायस्पीड गाड्या तयार करण्यात येणार आहेत.
एका ट्रेनवर 110 ते 120 कोटी रुपये खर्च –
अधिकृत निवेदनानुसार, 16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे 110 कोटी ते 120 कोटी रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच सरासरी 115 कोटी रुपये खर्च होतील असे म्हणता येईल.
वंदे भारत ट्रेनची सुरक्षा –
नव्या वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. धोक्याच्या स्थितीत ट्रेन सिग्नल ओलांडल्याच्या घटना टाळण्यासाठी कोलिशन अवॉयडन्स सिस्टम प्रणाली वापरण्यात येणार आहे. ट्रेनमध्ये एक अतिरिक्त सेंट्रलाइज्ड मॉनिटरिंग कोच देखील दिला जाईल, ज्यामधून सर्व इलेक्ट्रिकल घटक आणि हवामान नियंत्रणावर लक्ष ठेवले जाईल.
जुन्या गाड्यांच्या तुलनेत, नवीन गाड्या अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह अपग्रेड केल्या गेल्या आहेत, ज्यात डब्यांमध्ये फायर डिटेक्शन अलार्म, रूम आणि टॉयलेटमध्ये फायर डिटेक्शन सिस्टम, आपत्ती दिवे, आपत्कालीन दिवे यांचा समावेश आहे. प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन खिडक्यांचा समावेश आहे. याशिवाय आपत्कालीन पुश बटण आणि टॉक-बॅक सिस्टीम देण्यात आली आहे, ज्याद्वारे लोको पायलटशी बोलता येईल.
यामध्ये विमानाप्रमाणे बसण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी म्हणाले की, नवीन गाड्या प्रवाशांना उत्तम प्रवास सोई देतील. एक सुधारित बोगी विकसित करण्यात आली असून 99 टक्के गाड्या देशी बनावटीच्या असीतल, ज्यात भारताबाहेरील फक्त किरकोळ घटक असतील. त्यांना स्वयंचलित दरवाजे, सेन्सरवर चालणारे दरवाजे असतील.
दर महिन्याला 10 ट्रेन तयार करण्याची योजना –
आयसीएफ दरमहा सुमारे 10 गाड्यांचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे. त्यानंतर आरसीएफ-कपूरथळा आणि रायबरेली येथील आधुनिक कोच फॅक्टरी पुढील तीन वर्षांत 400 वंदे भारत गाड्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी डब्यांची निर्मिती करणे सुरू करेल. सध्या दिल्ली ते कटरा आणि दिल्ली ते वाराणसी दरम्यान दोन गाड्या धावत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात ही ट्रेन देशातील सर्व झोनमधून धावणार असून ती सर्व झोनच्या स्थानकांमधून जाणार आहे.