नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. आज ज्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले,
त्यामध्ये उदयपूर – जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई- चेन्नई, हैदराबाद-बेंगळुरू, विजयवाडा चेन्नई (रेणूगुंटा मार्गे), पाटणा – हावडा, कासारगोड – तिरुवनंतपुरम, राउरकेला – भुवनेश्वर – पुरी, रांची – हावडा आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.
या नऊ वंदे भारत गाड्यांचा एकाचवेळी प्रारंभ होणे म्हणजे देशातील आधुनिक दळणवळण सुविधा क्षेत्रासाठी अभूतपूर्व प्रसंग आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची ही गती आणि व्याप्ती, 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी तंतोतंत जुळणारी आहे. असे पंतप्रधान म्हणाले.
पायाभूत सुविधांच्या विकासात सातत्यपूर्ण समन्वय आणि वाहतूक तसेच निर्यातीशी संबंधित शुल्क कमी करण्यासाठी नवीन लॉजिस्टिक (मालवाहतूक) धोरण, यासाठी पीएम गतिशक्ती महा आराखडा अशा विविध उपक्रमांची जंत्री त्यांनीसादर केली.
वाहतुकीचा एक प्रकार दुसऱ्या प्रकाराला पूरक असला पाहिजे असे सांगत त्यांनी वाहतुकीच्या विविध प्रकारांचा समावेश असलेल्या दळणवळण व्यवस्थेबाबत भाष्य केले. सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी हे सर्व प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळात या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.
भारतीय रेल्वेच्या कायापालटासाठी सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना, पंतप्रधानांनी वाढीव अर्थसंकल्पाचा उल्लेख केला कारण यंदा रेल्वेसाठीचे बजेट 2014 च्या रेल्वे बजेटच्या 8 पट आहे. त्याचप्रमाणे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि नवीन मार्गांचे काम सुरू आहे, असेही ते पुढे म्हणाले.
11 राज्यांमधील दळण वळण वाढणार !
आज प्रारंभ झालेल्या नऊ वंदे भारत रेल्वेगाड्यांमुळे राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांदरम्यान दळणवळण वाढीला लागेल.
सध्या या मार्गांवर धावणाऱ्या सर्वात वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासारगोड-थिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 3 तासांनी वेगाने धावेल; हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस 2.5 तासांपेक्षा जास्त वेगाने;
तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस 2 तासांपेक्षा जास्त वेगाने; रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 1 तास वेगाने तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास वेगाने धावतील.