18 जणांविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
पिंपरी – चित्रीकरणासाठी आलेल्या स्टाफने जेवण देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत तोडफोड केली. याप्रकरणी 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरणासाठी आल्याने आरोपी हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे हा प्रकार रविवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास घडला.
सलमान मोहम्मद अकरम खान (वय 24, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई), अनिल गुप्ता (वय 42, रा. नालासोपारा ईस्ट, ठाणे), धर्मेन्द्र कुमार (वय 28, रा. भायंदर वेस्ट, ठाणे), सूर्यकांत साहू (वय 31, रा. साकीनाका, मुंबई), अनिल तानाजी पराडकर (वय 39, रा. आरे कॉलनी, मुंबई), गौतम शर्मा (वय 42, रा. खगरिया, बिहार), सुहास रंजन (वय 51, रा. फत्तेबाद, बिहार), कुलदीप विश्वकर्मा (वय 33), राजकुमार यादव (वय 40, दोन्ही रा. झारखंड), बालू शाहू (वय 40, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई), भानूप्रताप सिंग (वय 30, रा. पतारिहा, गढवा, सेमौरा झारखंड), प्रतीक पवार (वय 27, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश), विजय लालजी यादव (वय 23, रा. खार वेस्ट, मुंबई) व इतर पाच ते सहा लोक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 30) फिर्याद दिली आहे.
इमे इंटरटेनमेंट अँड मोशन पिक्चरचा स्टाफ चित्रीकरणासाठी हिंजवडी येथे आला होता. ते फिर्यादीच्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून रविवारी रात्री जेवण देण्यास उशीर झाला. या कारणावरून आरोपींनी चिनी मातीच्या प्लेट कर्मचाऱ्यांच्या हातावर मारल्या. तसेच डायनिंग हॉलमधील 16 डिनर प्लेट, 11 खुर्च्या तोडून दोन रूममधील टीव्ही फोडले. तसेच बेड मॅट्रेस फाडल्या, बाथरूमच्या काचा फोडल्या.
आठ पिलो कव्हर्स, चार बेडशीट फाडल्या, हॉटेलमधील इतर रूममध्ये देखील सुमारे 65 हजार रुपयांचे नुकसान केले. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. रिसेप्शनवर काम करणाऱ्या तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.