- पोलिसांना मारहाण
पिंपरी – एका तरुणाने रुपीनगर पोलीस चौकीत पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा घातला. चौकीतील साहित्याची तोडफोड करून पोलिसांना मारहाण केली. याबाबत तरुणाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 31) दुपारी घडली.
प्रवीण संजय गिरी (वय 28, रा. सहयोगनगर, तळवडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदेश संभाजी इंगळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण रुपीनगर पोलीस चौकीत पोलिसांशी हुज्जत घालत होता. त्याला समजावण्यासाठी फिर्यादी पोलीस उपनिरिक्षाक इंगळे गेले असता आरोपीने पोलिसांना शिवीगाळ केली. उद्धट वर्तन करून पोलिसांना मारण्यासाठी आरोपीने कीबोर्ड उगारला. त्यानंतर कीबोर्ड फेकून देऊन धक्काबुकी करून पोलिसांना मारहाण केली. यात फिर्यादी यांना दुखापत झाली. याबाबत आरोपी प्रवीणच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.