पुणेः खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आणि आता मकोका लावण्यात आलेल्या वाल्मीक कराडबद्दल दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. पिंपरी चिंचवड परिसरात त्याच्या नावावर दोन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली असतानाच आता हडपसर भागात दुसऱ्या पत्नीच्या नावे फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराडचा दोनदा विवाह झाला असून त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर पुणे परिसरात मोठी संपत्ती असल्याचे समजते. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहण्यास होता, असे देखील सांगितले जात आहे. तसेच एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्योती जाधव यांच्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड येथे असलेल्या दोन फ्लॅटची थकबाकी भरली नसल्याने या दोन्ही फ्लॅटच्या लिलावाची प्रिक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, थकबाकी असल्याची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ ही थकबाकी असलेली रक्कम त्याच्या कुटुंबाने अॅानलाइन पद्धतीने भरली आहे. आता कराडची मालमत्ता पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये दोन आणि खराडी इथे एक फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.
नोटीस बजाविल्यानंतर कर भरणा
पिंपरी शहरातील उच्चभ्रू पार्क स्ट्रीट या सोसायटीत असलेल्या फ्लॅटचे थकलेला कर न भरल्याने या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली होती. मात्र, गुरुवारी १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकलेला कर त्याच्या कुटुंबीयांनी भरल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. तसेच वाकड येथील पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील ४०३ नंबरचा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मीक कराडचे नाव आहे. पत्नी मंजली वाल्मीक कराडच्या नावे हा अलिशान फ्लॅट असून आत्तापर्यंत एक रुपयांचाही कर भरण्यात आला नव्हता. महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर कर भरण्यात आला आहे.