Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप 1 आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
मात्र, खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कराडवर देखील मकोका लावण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
मंगळवारी कोर्टात हजर करणार
वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी शरणागती पत्करल्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आता खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. चौकशी केल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या मुद्यांवर कराडचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार, हे उद्या 14 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल
दरम्यान, सीआयडीच्या पोलीस कोठडीत असलेला वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येचा प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप केल जात आहे. पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याविरोधात वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल झाले असून अद्याप त्याच्यावर मोका दाखल करण्यात आला नाही.
गेल्या 13 दिवसांपासून वाल्मिक कराडची चौकशी सुरु
सध्या वाल्मिक कराडला बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीआयडीचे दोन अधिकारी कायम तैनात आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यातील दररोज एका अधिकाऱ्याला 24 तास ड्यूटी लावण्यात आली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून दररोज दोन तास त्याची चौकशी केली जात आहे.
धनंजय देशमुख यांचा आत्मदहनाचा इशारा
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी देखील वाल्मिक कराडवर मकोका लावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरोपीला मकोका आणि 302 आरोपामध्ये नाही घेतलं तर माझे कुटुंब मोबाईल टॉवर चढून आंदोलन करेल आणि त्या टॉवरवर मी स्वत:ला संपून घेतो, असे धनंजय देशमुख यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा: