परळी – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येताच परळीमध्ये समर्थकांनी तीव्र आंदोलन सुरू केले. परळी येथे वाल्मीक कराड समर्थक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यात एका समर्थकाने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यात या समर्थकाचा पाय काही प्रमाणात जळाला असल्याचे समोर आले आहे.
परळी पोलिस ठाण्याच्या बाहेर वाल्मीक कराडचे कुटुंबीय तसेच समर्थकांचा मोठा जमाव जमला असून तीव्र आंदोलन सुरू आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही भेट घेतली आहे.
परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक होत आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चप्पल मारत तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर वाल्मीक कराडच्या आईने देखील ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. या सगळ्यात परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली असून त्याला व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला.