गणेशोत्सवासाठी वल्लभनगर आगारातून कोकणात 40 जादा बस
जादा बसला मिळाले भरघोस उत्पन्न
एसटीच्या पुणे विभागात वल्लभनगर आगार अव्वलस्थानी
पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) आगाराने गणेशोत्सवासाठी सुरु केलेल्या जादा बसला भरघास उत्पन्न मिळाले आहे. वल्लभनगर येथील आगारातून खास कोकणवासियांना गणेशोत्सवाकरिता कोकणात जाता यावे यासाठी 40 जादा बसचे नियोजन केले होते. या बसमुळे एसटीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. गणेशोत्सवात उत्पन्नाच्या तालिकेत वल्लभनगर आगाराने पुणे विभागातील इतर सर्व आगारांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गणेशोत्सवाकरिता सोडण्यात आलेल्या जादा बसला पिंपरी-चिंचवडवासियांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आगाराकडून 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पाच दिवस जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या पाच दिवसात आगाराला प्रतिदिन 3 ते 4 लाख रुपये जादा असा 10 ते 11 लाख रुपयांचा दैनंदिन महसूल मिळाला आहे. वल्लभनगर आगाराला दैनंदिन 5 ते 6 लाखांचा महसूल मिळतो. त्यात, जादा बसमुळे मोठी भर पडली आहे. यामुळेच यंदा पुणे विभागातील 12 आगारापैकी वल्लभनगर आगाराने गणेशोत्सव कमाईच्या तालिकेत अव्वलस्थान प्राप्त केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वल्लाभनगर आगारातून कोकणात जादा बसेस सोडण्यात येतात. यंदा कोकणात 40 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.