सातव्या वेतन आयोगाचे 25 हजार मिळाले
पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर अद्याप सातवा वेतन आयोग लागू केला नसला तरी, या वेतन आयोगापोटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये उचल देण्यास महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचाही वॅलेंटाईन डे गोड होणार आहे.
राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानुसार, महापालिकेकडूनही आपल्या कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यासाठी अहवाल मागविला आहे. त्यासाठी सभागृह नेत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून समितीकडून आपला अहवाल लवकरच शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
मात्र, पालिका आणि शासनाकडून देण्यात येणारा ग्रेड पेमध्ये तफावत असल्याने हा अहवाल अडचणीत सापडला असून आयोग लागू करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे आयोग लागू होईपर्यंत प्रत्येक पालिका कर्मचाऱ्यास 50 हजार रुपयांची उचल मिळावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. तसेच, स्थायी समिती आणि मुख्यसभेने ही रक्कम 25 हजार प्रमाणे देण्यास मान्यता दिली होती.