वळसे पाटील, आढळरावांचे सूत पुन्हा जुळणार?

* महा”शिव’आघाडी झाल्यास शिरूर-आंबेगावला पुन्हा मंत्रिपदाची संधी
* राज्यात सत्ता स्थापनेचे त्रांगडे अद्यापही रेंगाळलेलेच
रमेश जाधव
रांजणी – राज्यात सत्ता स्थापनेचे त्रांगडे अद्यापही रेंगाळलेलेच आहे. त्यातच महाशिवआघाडीसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चर्चा झडत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस भविष्यात एकत्र आले तर आंबेगाव-शिरूरला पुन्हा एकदा मंत्रीपद शक्‍य आहे. असे झाल्यास माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे सूत पुन्हा जुळू शकेल काय, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिला आहे. या तालुक्‍यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊ घातल्याने मंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार, याबाबत येथील जनतेमध्ये आतापासूनच चर्चा झडू लागल्या आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहिलेले आणि 2004 नंतर राष्ट्रवादीपासून अलिप्त होऊन शिवसेनेत प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांच्यातील गेल्या 15 वर्षांमधील सख्य सगळ्यांनाच माहित आहे. अशा परिस्थितीत जर का राज्यात महा”शिव’आघाडी झाली तर वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणार का, हे पाहणेही औत्स्युक्‍याचे आहे.

दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडून दिल्यानंतर आढळराव पाटलांनी सलग तीनवेळा खासदारकीची शिवसेनेच्या माध्यमातून हॅट्ट्रिक साधली. मात्र, 2019च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हेंच्या माध्यमातून वळसे पाटलांनी आढळरावांचा मेरू रोखला. तर शिवसेनेने आढळराव पाटलांवर पुन्हा नव्याने उपनेतेपद देऊन पक्षाची जबाबदारी सोपविली. राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन भिन्न विचारधारांच्या पक्षांमध्ये वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी आपापली राजकीय पत वाढविली. अर्थात कट्टर राजकीय शत्रुत्व दोघांनीही गेल्या 14 ते 15 वर्षांत जपले, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही सध्यातरी सख्य राहिलेले दिसून येत नाही.
कार्यकर्त्यांना पडला प्रश्‍न
दोन्ही नेत्यांच्या बाबतीत आजही एकमेकांचे कार्यकर्ते एकेरी भाषा वापरून आंबेगाव-शिरूरमध्ये दोघांचाही उद्धार उघडपणे करीत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकारणाने आता वेगळे वळण घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांच्या गळ्यात हात घालणार का? हे अद्यापतरी स्पष्ट झालेले नाही; परंतु राज्याच्या राजकारणात महा”शिव’आघाडीची सूत्रे फिरू लागल्याने शिरूर-आंबेगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमके आपण काय बोलावे, असा प्रश्‍न पडला आहे.

मंत्रीपद नेमके कोणाला?
गेली अनेक वर्षे एकमेकांना धनाजी-संताजी सारखे पाण्यात पाहणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता एकत्र येऊन आपला किमान समान कार्यक्रम राबवितांना दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे देखील तितकेच खरे. सद्यस्थितीत महाशिवआघाडीची सत्ता स्थापनेची बोलणी सुरू आहेत. अशा परिस्थितीत आंबेगाव-शिरूरला मंत्रीपदाची संधी असल्याचे आता दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी बोलत आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची माळ वळसे पाटील की आढळराव पाटील? यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता देखील आंबेगाव-शिरुरकरांना
लागून राहिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here